रावळपिंडी : हसन अली आणि शाहीन आफ्रिदी यांच्या भेदक माऱ्यापुढे नांगी टाकणाऱ्या द. आफ्रिकेने येथे संपलेला दुसरा कसोटी सामना ९५ धावांनी गमावताच पाकिस्तान संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केले. हसन अलीने सामन्यात दहा बळी घेत २००८ नंतर पाकला आफ्रिकेवर पहिल्यांदा मालिका विजय मिळवून दिला. कराचीतील पहिली कसोटी पाकने सात गडी राखून जिंकली होती.
पाकिस्तानने पहिल्या डावात २७२ आणि दुसऱ्या डावात २९८ धावा केल्या होत्या. आफ्रिकेचा संघ २०१ धावात बाद झाल्याने ७१ धावांनी माघारला होता. दुसर्या डावात त्यांना ३७० धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या डावात ५४ धावात पाच बळी घेणारा २६ वर्षांचा वेगवान गोलंदाज हसन अली याने ६० धावात अर्धा संघ गारद करताच आफ्रिकेचा दुसरा डाव ९१.४ षटकात २७४ धावात संपुष्टात आला. मार्करामने २४३ चेंडूत १३ चौकार आणि तीन षटकारांसह सर्वाधिक १०८, तर बावुमाने सहा चौकारांसह ६१ धावांचे योगदान दिले. मार्कराम बाद झाला तेव्हा आफ्रिकेची ४ बाद २४१ अशी स्थिती होती. थोड्यात वेळात ९१ षटकात सर्वबाद २७४ इतकी दारुण झाली. पाककडून हसन अली शिवाय डावुखरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने चार तसेच फिरकी गोलंदाज यासिर शाहने एक गडी बाद केला.
त्याआधी, एडेन मार्करामची शतकी खेळी आणि तेम्बा बावुमाच्या दमदार फटकेबाजीमुळे द. आफ्रिका सामना जिंकेल असे चित्र होते. तथापि, पाहुण्या संघाने अखेरचे सात फलंदाज अवघ्या ३३ धावात गमावल्याने त्यांच्यावर ‘चोकर्स’चा ठपका कायम राहिला आहे. मार्करामने पाचवे शतक झळकविले. २०१८ नंतर सतेच भारतीय उपखंडात हे त्याचे पहिले शतक ठरले.
पाकिस्तान पाचव्या स्थानी
या विजयामुळे पाकिस्तान संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर आला. २०१७ नंतर ही त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. द. आफ्रिका संघ मात्र सहाव्या स्थानावर घसरला.
हसन अलीची शोएबशी बरोबरी
सामनावीर ठरलेला वेगवान गोलंदाज हसन अली याने ११ व्या कसोटीत पहिल्यांदा दहा गडी बाद करण्याचा विक्रम नोंदविला. २१ डावांमध्ये त्याच्या नावावर ४३ बळींची नोंद असून याआधी शोएब अख्तर याने पेशावर येथे १८ वर्षांआधी बांगला देशविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
Web Title: PAK vs SA 2nd Test Pakistan Beat South Africa By 95 Runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.