पाकिस्तानने काल श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३४४ धावा कुटुन काढल्यानंतर अब्दुल्ला शफिक आणि मोहम्मद रिझवान यांच्या झंझावाती शतकांच्या जोरावर पाकिस्तानने दहा चेंडू राखत ३४५ धावांचे लक्ष्य गाठले. त्याबरोबरच वर्ल्डकपमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने फलंदाजी करताना झालेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष नाबाद १३१ धावांची खेळी करत श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला होता. मात्र आता स्वत: रिझवाननेच या दुखापतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
३४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत पाकिस्तानने नवा इतिहास रचला. वर्ल्डकपमध्ये याआधी कुठल्याही संघाला एवढ्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वीरीत्या पाठलाग करता आला नव्हता. ३४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने सुरुवातीच्या दोन विकेट्स ३७ धावांवर गमावल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद रिझवानने अब्दुल्ला शफीक सोबत १७६ धावांची भागीदारी करत सामन्याचे पारडे फिरवले होते. रिझवानने १२१ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३१ धावांची खेळी केली होती.
दरम्यान, मोहम्मद रिझवान हा शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या पाठीमध्ये वेदना जाणवू लागल्या होत्या. फटका खेळल्यानंतर तो जमिनीवर झोपला होता. तेव्हा श्रीलंकन खेळाडूंनी त्याला मदतही केली होती. तेव्हा पाठीबरोबरच त्याने पायांकडेही इशार केला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढी दुखापत झाली असतानाही रिझवानने अनेकदा धावत दोन धावा पूर्ण केल्या. दुखापतीनंतरही मैदानात धीराने उभ्या राहिलेल्या रिझवानबाबत लोकांना कौतुक वाटत होते.
सामन्यानंतर जेव्हा मोहम्मद रिझवानला त्याला झालेल्या दुखापतीबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने धक्कादायक उत्तर दिलं. तो म्हणाला की, जेव्हा मी खेळत होतो. तेव्हा कधी कधी क्रॅम्पस येत होते. मात्र कधी कधी मी तसं होत असल्याचं नाटक करत होतो.