नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना खेळवला जात आहे. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा टिकाव लागला नाही. तरीदेखील झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 बाद 130 धावा करून पाकिस्तानला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले. खरं तर पाकिस्तानचे खेळाडू खराब फिल्डिंगमुळे नेहमी ट्रोल होत असतात. मात्र कर्णधार बाबर आझमने एक शानदार झेल घेऊन टोलर्संना उत्तर दिले आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वे आणि पाकिस्तानमधील सामन्यात झिम्बाब्वेच्या डावात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शानदार झेल घेतला. बाबर आझमने स्लीपमध्ये एका हाताने अतिशय अवघड झेल घेतला, ज्यामुळे त्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
हा झेल झिम्बाब्वेच्या डावाच्या 14व्या षटकात पाहायला मिळाला. शादाब खान त्याच्या कोट्यातील शेवटचे षटक टाकत होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर शादाबने झिम्बाब्वेच्या रेगिस चकाबवाला वेगाने चेंडू टाकला. चकाबवाला चेंडूचा बचाव करायचा होता, पण तो त्याच्या बॅटच्या काठावर आदळला आणि थेट स्लिपच्या दिशेने गेला. यादरम्यान बाबर आझमने शानदार वेग दाखवत उजवीकडे उडी मारत एका हाताने अतिशय अवघड झेल सहज पकडला.
पाकिस्तानची शानदार गोलंदाजीझिम्बाब्वेकडून निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी वेस्ली माधवेरे (17) आणि क्रेग एर्विन (19) यांच्यात 42 धावांची चांगली भागीदारी झाली होती, परंतु यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांना कोणतीच मोठी भागीदारी नोंदवता आली नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा करून झिम्बाब्वेची फलंदाजी मोडित काढली. यामुळेच संघाची धावसंख्या 20 षटकांत केवळ 130 धावांपर्यंतच पोहोचू शकली. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 131 धावांचे आव्हान आहे. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक (4) बळी पटकावले. तर शादाब खानला (3) आणि हारिस रौफला (1) बळी घेण्यात यश आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"