Join us  

अफगाणिस्ताच्या फिरकीसमोर पाकिस्तानने गुडघे टेकले, कसेबसे दोनशेपार पोहोचले

आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानने तयारी सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 6:38 PM

Open in App

आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानने तयारी सुरू केली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात झाली अन् पहिल्याच सामन्यात बाबर आजम अँड कंपनीची दैना झाली. आशिया चषक स्पर्धेत भारताला पराभूत करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानने आज अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंसमोर गुडघे टेकले. कर्णधार बाबर आजम दुसऱ्याच षटकात मुजीब उर रहमानच्या ( ३-३३)  फिरकीवर फसला अन् भोपळ्यावर पायचीत झाला. त्यानंतर मोहम्मद नबी ( २-३४)  व राशीद खान ( २-४२) यांनी पाक फलंदाजांना नाचवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला पहिल्याच षटकात धक्का बसला. फझलहक फारूकीने चौथ्या चेंडूवर सलामीवीर फखर जमानला माघारी पाठवले. कर्णधार बाबर मैदानावर येताच अफगाणिस्तानने फिरकी गोलंदाज मुजीबला पाचारण केले अन् बाबरला पायचीत केले. मोहम्मद रिझवानलाही ( २१) मुजीबने बाद केले. आगा खानला ( ७) राशीद खानने माघारी पाठवले. ५ बाद ११२ अशा अवस्थेत असलेल्या पाकिस्तानला इमाम-उल-हक व इफ्तिखार अहमद यांनी सावरले. मोहम्मद नबीने ही जोडी तोडली अन् इफ्तिखार ( ३०) माघारी परतला. इमाम ९४ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. नबीने ही महत्त्वाची विकेट मिळवली. इमामच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या डावाला पुन्हा गळती लागली. मुजीब व राशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेत पाकिस्तानची अवस्था ८ बाद १६३ अशी केली. शादाब खान आणि नसीम शाह यांनी ९व्या विकेटसाठी दमदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार नेले. पण, दोघांमधील ताळमेळ चुकला अन् शादाब ( ३९) रन आऊट झाला. पाकिस्तानचा संघ ४७.१ षटकांत २०१ धावांवर ऑलआऊट झाला.  

टॅग्स :पाकिस्तानअफगाणिस्तानबाबर आजम
Open in App