Iftikhar Ahmed Reacts To Pakistan Team's Diet : पाकिस्तानी संघ आताच्या घडीला 'करा किंवा मरा'च्या स्थितीत आहे. कारण शेजाऱ्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उरलेले दोन्हीही सामने जिंकावे लागतील. याशिवाय नेटरनरेट कमी असल्यामुळे इतर संघांवर देखील अवलंबून राहावे लागेल. शनिवारी वन डे विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. दोन्हीही संघ अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून असून पाकिस्तानी संघाला उद्या कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे.
पाकिस्तान सहा गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर बाबर आझमच्या संघाला सलग चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण, बांगलादेशला नमवून शेजाऱ्यांनी पुनरागमन केले. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदने एक विधान केले. "आम्ही पराभूत होतो तेव्हा बिर्याणी खातो असे बोलले जाते, पण जिंकल्यानंतर काहीच बोलले जात नाही. बिर्याणी खाल्ल्यामुळे पराभव होतो का? हे सर्व चुकीचे आहे, यामुळे देशाचे नाव खराब होत असून आम्ही त्याच्याविरोधात आहे", असे इफ्तिखार अहमदने सांगितले.
पाकिस्तानने विश्वचषक मोहिमेची सुरुवात हैदराबादमधून केली होती. तिथे शेजाऱ्यांनी बिर्याणीवर चांगलाच ताव मारला. पाकिस्तानी खेळाडू बिर्याणी खात असतानाचे फोटो समोर आले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीही पाकिस्तान संघाने ऑनलाइन बिर्याणी ऑर्डर केली होती. त्यावरून त्यांची फिरकी घेतली जात आहे.
पाकिस्तानसाठी 'करा किंवा मरा'न्यूझीलंडविरूद्धचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पाकिस्तानी संघाला चालू विश्वचषकात केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेजाऱ्यांना विजय मिळवणे आवश्यक आहे.