ICC T20 World Cup 2021: आयसीसीची ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धा सध्या यूएईमध्ये सुरू असून आता उपांत्य फेरीच्या लढतीला उद्यापासून सुरूवात होणार आहे. याआधी आयसीसीनं ऑक्टोबर महिन्यासाठीचा आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. पाकिस्तानचा संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. साखळी फेरीत पाकिस्ताननं एकही सामना गमावलेला नाही आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानची उपांत्य फेरीतील लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
आयसीसीनं पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली आणि आयर्लंडची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू लॉरा डेलानी यांना ऑक्टोबर महिन्याचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर केला आहे. आसिफ अली यानं बांगलादेशच्या शाकिब अल हसन आणि नामीबियाच्या डेविड वीजा यांना पिछाडीवर टाकून पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
आसिफनं सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानकडून तीन सामन्यांमध्ये एकूण मिळून केवळ २३ चेंडू खेळले आहेत. यात त्यानं ५२ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट तब्बल २७३.६८ इतका राहिला आहे. आसिफच्या १२ चेंडूतील नाबाद २७ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं न्यूझीलंडवर मात केली होती. पण त्यानंतरच्या सामन्यात आसिफनं आणखी एक जबरदस्त कामगिरी केली. अफगाणिस्तान विरुद्ध शेवटच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानला विजयासाठी २४ धावांची गरज असताना आसिफनं तुफान फटकेबाजी केली. सामन्याच्या १९ व्या षटकात चार उत्तुंग षटकार ठोकून पाकिस्तानला विजय प्राप्त करुन दिला होता.
केवळ ५२ धावा ठोकून आसिफ बनला सर्वोत्तम क्रिकेटपटूआसिफ यानं सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानकडून केवळ तीन सामने खेळले. यात त्यानं एकूण मिळून ५२ धावा केल्या आणि स्ट्राइक रेट तब्बल २७३.६८ इतका होता. "संघाला विजय प्राप्त करुन देणं आणि विशेष म्हणजे जेव्हा तुमचा संघ पराभवाच्या छायेत असताना उल्लेखनीय कामगिरी करुन विजयश्री खेचून आणणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आसिफनं अशी कामगिरी एकदा नव्हे, तर दोनवेळा केली आहे. त्यामुळे तो विशेष ठरला आहे", असं आयसीसी वोटिंग अकादमीचा सदस्य इरफान पठाण म्हणाला.