नेपियर : शादाब खानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने नेपियर टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडवर चार गडी राखून मात करीत ‘व्हाईटवॉश’ची नामुष्की टाळली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १७४ धावांचे आव्हान पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले. अखेरचा सामना गमावला असला तरीही न्यूझीलंडने मालिका २-१ ने जिंकली आहे. तिन्ही सामन्यांत आक्रमक खेळी करणाऱ्या टीम सेफर्टला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला धक्का देण्यात पाकिस्तानला यश आले. हारिस रौफने मार्टीन गुप्तिलला तर फईम अश्रफने सेफर्ट आणि विल्यमसनला बाद केले. यानंतर डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलीप्स यांनी फटकेबाजी करत डाव सावरला. कॉनवेने ४५ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार लगावत ६३ धावा केल्या. फिलीप्सने त्याला ३१ धावा काढत चांगली साथ दिली. या जोरावर न्यूझीलंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. पाकिस्तानकडून फईम अश्रफने तीन , शाहीन आफ्रिदी-हारिस रौफ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने आश्वासक सुरुवात केली. सलामीला ४० धावांची भागीदारी झाल्यानंतर हैदर अली बाद झाला. यानंतर मोहम्मद हाफीजने पुन्हा एकदा महत्वपूर्ण खेळी करीत रिझवानला साथ दिली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर कुगलेजनने जोडी फोडली. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. त्यातच ५९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह सर्वेात्तम ८९ धावांची खेळी करणारा रिझवान माघारी परतला, याननतर पाकिस्तान हातातला सामना गमावतो की काय अशी स्थिती होती. इख्तियार अहमदने फटकेबाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अर्धशतकी खेळी करणारा मोहम्मद रिझवान सामनावीर ठरला. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि स्कॉट कुगलीजन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात
पाकने टाळला ‘व्हाईटवॉश’, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात
new zealand vs pakistan : नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला धक्का देण्यात पाकिस्तानला यश आले.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 1:38 AM