चेन्नई : पराभवाची हॅट्ट्रिक नोंदविल्यानंतर पाकिस्तान संघाला वनडे विश्वचषकात आव्हान टिकविणे कठीण होऊन बसले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारी होणारा सामना त्यांच्यासाठी ‘करा किंवा मरा’ असाच असेल. पराभव झाल्यास बाद फेरीचे मार्ग बंद होणार आहेत. अशावेळी कर्णधार म्हणून बाबर आझमच्या नेतृत्वावर टांगती तलवार असेल. खराब कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या बाबरला पराभवानंतर काय होईल, याची जाणीव असावी. पाकला आता प्रत्येक सामना जिंकावा लागेल. शिवाय ऑस्ट्रेलियाने चारपैकी किमान दोन सामने गमवावेत, अशी प्रार्थनाही करावी लागेल.
धर्मशाला येथे नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरही क्विंटन डिकॉक आणि हेन्रिच क्लासेन यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. या दोघांना एडेन मार्करामची साथ लाभली.
डिकॉक, क्लासेन, मार्कराम, डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सेन यांचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा अधिक असून, पाक संघातील सौद शकील आणि इफ्तिखार अहमद यांचाच स्ट्राईट रेट १०० हून अधिक राहिला. गोलंदाजीत शाहिनशाह आफ्रिदी फ्लॉप ठरला, तर हारिस रौफदेखील विशेष कामगिरी करू शकला नाही. नसीम शाहची संघाला उणीव भासतेय. आता जमान खान किंवा मोहम्मद वसीम ज्युनिअर यापैकी एकाला संधी दिली जाईल. पाकचा कच्चा दुवा म्हणजे प्रभावी फिरकीपटूंची उणीव. लेग स्पिनर उसामा मीर दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला. शादाब ‘ऑफ फॉर्म’ आहे.
दक्षिण आफ्रिका जिंकल्यास उपांत्य फेरीचा त्यांचा मार्ग प्रशस्त होणार आहे. त्यांची फलंदाजी भक्कम आहेच शिवाय गोलंदाजीत कॅगिसो रबाडा, यान्सेन आणि गेरॉल्ड कोएत्झी अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. केशव महाराजने ७ गडी बाद केले.
आमने-सामने
एकूण वनडे लढती ८२
द. आफ्रिका विजयी ५१
पाकिस्तान विजयी ३०
निकाल नाही ०१
मागील पाच सामन्यांत
द. आफ्रिका
चौकार १५५, षट्कार ५९
पाकिस्तान
चौकार १३६,
षट्कार २४
Web Title: pakistan back to home if they lose against south africa in icc wc 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.