नवी दिल्ली : इफ्तिखार अहमदने आज पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) प्रदर्शनीय सामन्यात वहाब रियाझने टाकलेल्या एका षटकात सहा षटकार ठोकून ट्वेंटी-20 क्रिकेटमधील आपली शानदार लय कायम ठेवली आहे. पेशावर झाल्मीविरूद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना अहमदने डावाच्या 20व्या षटकात 36 धावा केल्या. पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज वहाब रियाझच्या गोलंदाजीवर इफ्तिखारने ही किमया साधली.
50 चेंडूत 94 धावा तत्पुर्वी, पेशावर झाल्मीचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून सरफराज अहमदच्या क्वेटा ग्लॅडिएटर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. क्वेटा ग्लॅडिएटर्सने 20 षटकांत 184 धावा केल्या. 184 पैकी 36 धावा वहाब रियाझने टाकलेल्या शेवटच्या षटकात आल्या. इफ्तिखार अहमदच्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर ग्लॅडिएटर्सच्या संघाने बाबरच्या संघासमोर 185 धावांचे तगडे आव्हान ठेवले. इफ्तिखारने अहमदने 50 चेंडूत 94 धावा करत डाव संपवला.
इफ्तिखार अहमदने अलीकडेच बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) 2023 मध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली. आजच्या या पाकिस्तान सुपर लीगच्या प्रदर्शनीय सामन्यासाठी क्वेटा ग्लॅडिएटर्समध्ये सामील होण्यापूर्वी अहमद बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्यून बरीशालसाठी खेळत होता. त्याने संघासाठी 10 सामने खेळले असून 347 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकांची नोंद आहे. अहमदने स्पर्धेत 161.39 च्या शानदार स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"