सिल्हेट : सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 137 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना भारतीय महिलांना अपयश आले. पाकिस्तानच्या आक्रमक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज चितपट झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानी गोलंदाजांनी सांघिक खेळी करून भारतीय संघाचा विजयरथ रोखला आणि 13 धावांनी मोठा विजय मिळवला. खरं तर आशिया चषक 2022 मध्ये हा भारतीय संघाचा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघाने सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक लगावली होती.
तत्पुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. मात्र अखेरीस नीदा दारने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर त्यांनी भारतासमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताकडून कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून एस मेघना (15), स्मृती मानधना (17), डी हेमलता (20), दीप्ती शर्मा (16), तर रिचा घोष 26 धावा करून बाद झाली. अखेर भारतीय संघ 129 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 बळी पटकावले होते. तर पूजा वस्त्राकर (2) आणि रेणुका सिंगला 1 बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानकडून नीदा दार (2), सादिया इक्बाल (2) नशरा संधू (3) आणि तुबा हसन हिने 1 बळी घेतला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, एस मेघना, डी हेमलता, ऋचा घोष, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव.
7 संघांमध्ये रंगतोय 'सामना' 1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील 2 आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. त्यामुळे किताबासाठी सात संघ आमनेसामने असणार आहेत.