Join us  

PAK vs NED: पाकिस्तानने नेदलॅंड्सचा केला दारूण पराभव; आता भारताच्या सामन्याकडे शेजाऱ्यांचे लक्ष!

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाने नेदरलॅंड्सविरूद्ध 'करा किंवा मरा' असा सामना खेळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 3:35 PM

Open in App

पर्थ : टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाने नेदरलॅंड्सविरूद्ध 'करा किंवा मरा' असा सामना खेळला. ज्यात पाकिस्तानने विजय मिळवून विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले आहे. खरं तर दोन्हीही संघ विश्वचषकाच्या क्रमवारीत तळाशी आहेत. पाकिस्तानी गोलंदाजीसमोर नेदरलॅंड्सचे फलंदाज चितपट झाल्याचे पाहायला मिळाले. नेदरलॅंड्स २० षटकांत ९ बाद केवळ ९१ धावा करू शकला होता. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक ३ बळी पटकावून प्रतिस्पर्धी संघाची कंबर मोडली. त्याच्यापाठोपाठ मोहम्मद वसीमने २ बळी घेऊन नेदरलॅंड्सला शंभरचाही आकडा गाठू दिला नाही. अखेर नेदरलॅंड्सने पाकिस्तानसमोर विजयासाठी ९२ धावांचे सोपे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ६ गडी राखून सहज विजय मिळवला. पाकिस्तानने १३.५ षटकांत ४ गडी गमावून नेदरलॅंड्सचा पराभव केला. 

तत्पुर्वी, नेदरलॅंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलॅंड्सच्या कर्णधाराने घेतलेला निर्णय त्यांच्याच संघाला महागात पडला. पाकिस्तानच्या आक्रमक माऱ्यासमोर कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. नेदरलॅंड्सकडून कॉलिन एकरमनने सर्वाधिक २७ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. शादाब खानने पाकिस्तानकडून सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर मोहम्मद वसीमने २ बळी घेतले. तर शाहिन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. शेजाऱ्यांच्या डावात पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्याच षटकांत धावबाद झाला. बाबर आजच्याही सामन्यात फ्लॉप ठरला आणि ४ धावा करून स्वस्तात परतला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर फखर झमान २० धावा करून बाद झाला. या विजयासह मोहम्मद रिझवानने टी-२० मधील ६५ सामन्यांमध्ये २,५०० धावांचा आकडा गाठला आहे. तर नेदरलॅंड्सकडून ब्रँडन ग्लोव्हरने सर्वाधिक २ बळी पटकावले. 

पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. कारण आजच्या सामन्यातील विजयामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषकात जिवंत राहिला आहे. याशिवाय आज होणारा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानसाठी निर्णायक असणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर शेजाऱ्यांचे विश्वचषकातील आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, फखर झमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शाह. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानबाबर आजमटी-20 क्रिकेट
Open in App