हरारे : पाकिस्तानने सोमवारी येथे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा एक डाव १४७ धावांनी पराभव करीत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप दिला. पाकिस्तानला चौथ्या दिवशी विजयासाठी केवळ एका विकेटची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने दिवसाच्या पाचव्या षटकात ल्युक जोंगवे (३७) याला यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानकडे झेल देण्यास भाग पाडत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
झिम्बाब्वेने सकाळी आपला दुसऱ्या डावात ९ बाद २२० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि केवळ ११ धावांची भर घालत त्यांचा डाव २३१ धावांत संपुष्टात आला. आफ्रिदीने ५२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याच्या व्यतिरिक्त नौमान अलीने (८६ धावांत ५) यानेही पाच बळी घेतले. हसन अलीने पहिल्या डावात पाच बळी घेतले होते. झिम्बाब्वेला पहिल्या डावात केवळ १३२ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली होती. पाकिस्तानने पहिला डाव ८ बाद ५१० धावसंख्येवर घोषित केला होता. पाकने याच मैदानावर खेळला गेलेला पहिला कसोटी सामना एक डाव ११६ धावांनी जिंकला होता.
विदेशी खेळाडूंचा पीएसएल खेळण्यास नकार
- पाकिस्तान सुपर लीगच्या उर्वरित २० सामन्यांत खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्यास विदेशी खेळाडूंनी नकार दिला आहे. कोरोना थैमानामुळे हा नकार मिळाल्याची माहिती पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी दिली.
- पीसीबी चेअरमन एहसान मनी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे विनंती केल्यास सामने आयोजनाची परवानगी मिळू शकेल. तथापि विदेशी खेळाडूृ या सामन्यांसाठी पाकमध्ये येणार नाहीत, हे स्पष्ट असल्याचे सेठी यांनी म्हटले आहे. सामन्यांचे आयोजन दुबईत करण्याचा विचार पीसीबीने शुक्रवारी मांडला होता.
- २० फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत पीएसएल खेळविण्यास परवानगी मिळाली होती. २४ एप्रिल रोजी आयोजकांच्या विनंतीवरून सरकारने स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी बहाल केली. पुढे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने सामने स्थगित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव ८ बाद ५१० (डाव घोषित) आबिद अली नाबाद २१५, अझहर अली १२६, नौमन अली ९७, मुझारबानी ३-८२, चिसोरो २-१३१). झिम्बाब्वे पहिला डाव सर्वबाद १३२ (चकाब्वा ३३, हसन अली ५-२७). झिम्बाब्वे दुसरा डाव सर्वबाद २३१ (चकाब्वा ८०, ब्रेंडन टेलर ४९, शाहिन आफ्रिदी ५-५२, नौमन अली ५-८६)
Web Title: Pakistan beat Zimbabwe by 147 runs in the second Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.