नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेचा हिस्सा आहे. ट्वेंटी-20 विश्वचषकात विराट कोहलीने रौफला मारलेले 2 षटकार पाकिस्तानी गोलंदाजाची ओळख करून देतात. किंग कोहलीने 19 व्या षटकाच्या अखेरच्या 2 चेंडूवर षटकार ठोकून पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला होता. मात्र, आता हारिस रौफ त्याच्या फिटनेसबद्दलच्या वक्तव्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याने त्याचा डाएट प्लॅन सांगून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने त्याच्या डाएटबद्दल खुलासा करताना म्हटले की, तो त्याच्या डाएट प्लॅनबद्दल कधीही तडजोड करत नाही. 29 वर्षीय हारिस रौफने सांगितले की तो दररोज 24 अंडी खातो. असा डाएट प्लॅन पाकिस्तानचा माजी खेळाडू आकिब जावेदने सुचवली होती असेही रौफने सांगितले. दररोज 24 अंडी खातो - रौफ डाएट प्लॅन सांगताना रौफने म्हटले, "मी दररोज 24 अंडी खातो. आकिब जावेद यांनी मला हा डाएट प्लॅन सांगितला होता. 8 अंडी नाश्त्यासाठी, 8 दुपारच्या जेवणासाठी आणि 8 रात्रीच्या जेवणासाठी. मी पहिल्यांदा क्रिकेट अकादमीत गेलो होतो तेव्हा खोलीत अंड्यांचे क्रेट होते", असे रौफने जिओ न्यूजच्या 'हसना मना है' या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
10 किलो वजन वाढवलंमी एखाद्या पोल्ट्री फॉर्ममध्ये आलो असल्याचे मला वाटायचे असेही त्याने म्हटले. "तेव्हा माझे वजन 72 किलो होते आणि आकिब भाईने मला सांगितले की तुझे वजन जवळपास 82-83 किलो असणे आवश्यक आहे, तुझी उंची जमेची बाजू आहे. मी त्यानुसार आहार घेतला आणि आता माझे वजन 82 किलो आहे", असे हारिसने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"