पाकिस्तानचा १९ वर्षीय गोलंदाज मोहम्मद हस्नैन ( Mohammad Hasnain ) यानं बिग बॅश लीगमध्ये ( BBL ) सिडनी थंडर्सकडून ( Sydney Thunder ) आज पदार्पण करताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. BBLच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानं षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या व पाचव्या चेंडूवर विकेट घेतली. एवढेच नव्हे, तर त्यानं ते षटक निर्धाव फेकले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर थंडर्सनं एडलेड स्ट्रायकर्सवर २८ धावांनी विजय मिळवला.
हस्नैनं २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर्सकडून मॅथ्यू गिल्केसनं ९३ धावांची उल्लेखनीय खेळी केली आणि संघाला ७ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानं ५७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकार खेचले. बेन कटींगनं ३४ धावा केल्या. स्ट्रायकर्सकडून वेस अॅगर व पीटर सिडल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या स्ट्रायकर्सना तिसऱ्या षटकात हस्नैननं धक्के दिले. त्यानं सर्वप्रथम मॅथ्यू शॉर्टला ( १३) बाद केले. त्यानंतर जॅक वेदराल्डला ( १०) पायचीत पकडले आणि पाचव्या चेंडूवर जॉनथन वेल्स ( ०) याला माघारी पाठवले. या धक्क्यांमुळे स्ट्रायकर्सची अवस्था ३ बाद २५ अशी झाली.
मॅट रेनशॉ व हॅरी नाएलसन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना विजय मिळवून देता आला नाही. स्ट्रायकर्सचा निम्मा संघ ६५ धावांवर माघारी परतला. रेनशॉनं ३० आणि नाएलसननं ३९ धावा केल्या. स्ट्रायकर्सचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १४४ धावांवर माघारी परतला.
Web Title: Pakistan bowler Mohammad Hasnain becoming the first bowler in BBL history to take three wickets in their first over in the competition, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.