Pakistan bowler retirement from international cricket, Asia Cup 2023 IND vs PAK: आशिया कप 2023 च्या आधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका स्टार वेगवान गोलंदाजाने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ आहे. वहाब रियाझने (Wahab Riaz) आपल्या देशासाठी 15 वर्षांची कारकीर्द संपवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे.
वहाब रियाझ म्हणाला, 'मी गेल्या दोन वर्षांपासून माझ्या निवृत्तीच्या योजनांबद्दल बोलत आहे की, 2023 हे माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे ध्येय आहे आणि मी ते पूर्ण केले. आता मला अधिक आरामदायक वाटत आहे. मी सर्वोत्तम सेवा दिली आहे. देश आणि राष्ट्रीय संघांसाठी मी चांगली कामगिरी केली, असे वहाब रियाझने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. "आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आणि विशेषाधिकार आहे. मी या अध्यायाला निरोप देताना, फ्रँचायझी क्रिकेटमध्ये एक नवीन इनिंग सुरू करण्यास मी रोमांचित आहे. मला आशा आहे की मी काही खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करू शकेन. स्पर्धा करताना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास आणि त्यांना प्रेरित करण्यास मी सदैव तयार राहिन," असेही रियाझने सांगितले.
वहाब रियाझची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
वहाब रियाझने पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळले. 2020 मध्ये तो शेवटचा पाकिस्तान संघाचा भाग बनला होता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 34.50 च्या सरासरीने 83 विकेट्स घेतल्या, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 34.30 च्या सरासरीने 120 विकेट घेतल्या, तर T20 मध्ये त्याने 34 विकेट घेतल्या. वहाब रियाझ अलीकडे PSL 2023 मध्ये पेशावर झल्मीचा भाग होता.