Join us  

Pakistan bowling coach, PAK vs NZ: "तुम्ही फक्त प्रश्न विचारा, बाकीच्या गोष्टी...."; पाकिस्तानचा बॉलिंग कोच Shaun Tait पत्रकारावरच संतापला

पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटी मालिका अनिर्णित राहिल्यानंतर संघावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 6:56 PM

Open in App

Pakistan bowling coach, PAK vs NZ: कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी फारशी विशेष दिसली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा इंग्लंड विरूद्ध ३-० असा लाजिरवाणा पराभव झाला. त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमध्ये वेगवान गोलंदाजांचाही मोठा वाटा दिसला. २०२३ मध्ये पाकिस्तानी वेगवान गोलंदाज एकाही डावात पाच विकेट घेऊ शकले नाहीत. या साऱ्या गोष्टींबाबत जेव्हा पाकच्या गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेटला प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने पत्रकारांवरच संताप व्यक्त केला.

पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट याला प्रश्न विचारण्यात आले. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शॉन टेटला पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नांची उत्तरे देताना शॉन टेट पत्रकारांवर चांगलाच संतापलेला दिसला. एका पत्रकाराने शॉन टेटला विचारले की, या हंगामात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी तुम्ही समाधानकारक आहे असे कसे म्हणू शकता? यावर शॉन टेटने फक्त उत्तर दिले की- 'ते तुमचे मत आहे.'

गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. दुसर्‍या पत्रकाराने स्वतः टेटबद्दल प्रश्न उपस्थित केला. पत्रकार म्हणाला, 'हे संपूर्ण पाकिस्तानचे मत आहे. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नाही, असे अख्ख्या पाकिस्तानला वाटते. मी तुम्हाला विचारतो की, पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून तुम्ही केलेल्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? पाकिस्तानी गोलंदाजी तर फारशी चांगली झालेली दिसली नाही."

पत्रकाराच्या प्रश्नावर शॉन टेट चांगलाच संतापला. "तुम्ही फक्त प्रश्न विचारा. बाकीच्या गोष्टी सांगू नका. तुम्ही आधीच ठरवून येऊ नका. तुमची मतं मला सांगून काय उपयोग आहे? मला असं दिसतंय की तुम्हीच प्रश्न विचारता आणि मी काही बोलण्याआधी तुम्हीच त्याचं उत्तर देता. तुम्ही म्हणता की कामगिरी खराब झाली. बरं, ते तुमचं मत आहे, मला जे म्हणायचं आहे ते मी म्हणेन," असे रोखठोक मत त्याने मांडले.

शॉन टेटने पत्रकार परिषदेत सांगितलं की, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांसारख्या गोलंदाजांना झालेल्या दुखापतीमुळे पाकिस्तानला त्यांच्या वेगवान गोलंदाजांना सांभाळावे लागेल. सध्याच्या कसोटी हंगामातील कामगिरीवर गंभीर परिणाम झाला आहे. टेट म्हणाला, "मला वाटत नाही की कोणत्याही खेळाडूला तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत खेळत राहता येईल. सध्या खूप जास्त क्रिकेट खेळले जात आहे. आम्हाला त्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे हे वर्ष पाकिस्तानसाठी महत्त्वाचे असणार आहे. वर्षाच्या शेवटी काही मोठ्या स्पर्धा होतील. त्यावेळी वेगवान गोलंदाजांचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे ठरणार आहे."

टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तानन्यूझीलंड
Open in App