कराची : भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले की आपोआप वातावरण गंभीर होते. पण, दोन्ही देशांमधील ताणलेली परिस्थिती पाहता गेली अनेक वर्ष उभय संघ एकमेकांविरुद्ध क्वचितच आले होते. या दोन देशांमधील द्विदेशीय मालिका कधी होणार हे येणारा काळच सांगू शकेल, परंतु इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत हे प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे आणि आयसीसी स्पर्धेतील इतिहासही भारताच्या बाजूने आहे. 16 जूनला मँचेस्टर येथील ओल्ड ट्रेफर्ड येथे हा सामना होणार आहे.
इतिहास भारताच्या बाजूने असला तरी पाकिस्तानच्या माजी कर्णधार मोईन खानचे मत काही वेगळे आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान जिंकेल, असा दावा खानने केला आहे. भारत आणि पाकिस्तान हे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत सहावेळा समोरासमोर आले, परंतु पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. खान म्हणाला,'' पाकिस्तानचा सध्याचा संघ हा वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला नमवण्याची क्षमता राखतो. हा संघ संतुलीत आहे, युवा खेळाडूंनी भरलेला आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धचा इतिहास बदलण्याची धमक सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ राखतो.''
खान हा 1992 व 1999 च्या वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजयानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढल्याचे खान म्हणाला. ''दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघावर विजय मिळवला होता आणि इंग्लंडच्या वातावरणात पाकिस्तानचे गोलंदाज पुन्हा एकदा हा करिष्मा करून दाखवतील. हा वर्ल्ड कप खूप इंटरेस्टींग आहे आणि पाकिस्तान विराट कोहलीच्या संघाला नक्की पराभूत करेल. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तगड्या संघाविरुद्ध त्यांनी वन डे मालिका खेळल्या आहेत.''