नवी दिल्ली : पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. खरं तर या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताचे सामने तटस्थ ठिकाणी अर्थात श्रीलंकेत होणार आहेत. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. साखळी फेरीतील सामने खेळल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा सुपर-४ मध्ये पाकिस्तानशी भिडण्याची शक्यता आहे. आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू वकार युनूसने एक अजब विधान केले.
पाकिस्तानी संघ भारताला जगात कुठेही पराभूत करू शकतो असा दावा युनूसने केला आहे. बुधवारी लाहोरमध्ये आशिया चषक ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात बोलताना वकार युनूस म्हणाला की, बाबर आझम अँड कंपनीने बाजी मारली असून मोठ्या स्पर्धांमध्ये भारताविरूद्ध विजय मिळवण्यास सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा पुन्हा एकदा पराभव करण्यासाठी पाकिस्तानी संघ सज्ज आहे.
पाकिस्तान भारताला कुठेही हरवू शकतो - युनूस"आमच्या काळात आम्ही भारताविरुद्ध मोठ्या स्पर्धांमध्ये क्वचितच विजय मिळवला. पण एक चांगली गोष्ट म्हणजे पाकिस्तानी संघ आता भारताविरूद्ध मोठ्या व्यासपीठावर विजय संपादन करत आहे. हे एक चांगले लक्षण आहे. त्यामुळे आम्ही भारतीय संघाला कडवी झुंज देत आहोत. पाकिस्तानचा संघ कुठे खेळतो हे महत्त्वाचे नाही. कारण आम्ही भारताला ओव्हलमध्ये पराभूत केले आहे त्यामुळे त्यांना कुठेही हरवू शकतो. विद्यमान पाकिस्तानी संघात नवीन टॅलेंट आहे", असेही वकार युनूसने सांगितले.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल