महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2007मध्ये नाट्यमयरित्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना नेहमीच चुरशीचा, उत्साह वाढवणारा, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा असतो.. पण, 2007च्या त्या सामन्यानं सर्वांना श्वास रोखून धरायला लावले होते. कॅप्टन कूल धोनीनं जोगिंदर शर्माच्या हातात चेंडू देऊन अखेरच्या षटकात खेळलेला डाव यशस्वी ठरला. भारतानं 5 धावांनी सामना जिंकून जेतेपद नावावर कोरलं. पण, याच स्पर्धेत भारत-पाकिस्तान गट साखळीतही भिडले होते आणि तोही सामना तितकाच रोमहर्षक झाला होता. बॉल-आऊट ( Bowl Out) नियमावर त्या सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला होता. पण, पाकिस्तानचा कर्णधार शोएब मलिक याला बॉल-आऊट म्हणजे काय हेच माहित नसल्याचा खुलासा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनं केला.
पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) तेव्हा नियम बनवला होता की, ट्वेंटी-20 सामना बरोबरीत सुटल्यानंतर त्याचा निकाल बॉल-आऊटमध्ये लावण्यात येईल. हेच भारत भारत-पाकिस्तान सामन्यात झाले. भारतानं 9 विकेट गमावून 141 धावा केल्या होत्या आणि पाकिस्ताननंही तेवढ्याच धावा करून सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर बॉल-आऊटमध्ये भारतानं विजय मिळवला. या सामन्याचा किस्सा सांगताना इरफान पठाणने सांगितले की, पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार शोएब मलिक याला बॉल-आऊटचा नियमच माहित नव्हता.
बॉल-आऊटमध्ये भारताकडून हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पा यांनी गोलंदाजी करताना यष्टी उडवल्या होत्या, परंतु पाकिस्तानकडून उमर गुल, यासिर अराफत आणि शाहिद आफ्रिदी यांना एकदाही यष्टींचा वेध घेता आला नाही. 13 वर्षांनंतर इरफाननं त्या सामन्याचा मजेशीर किस्सा सांगितला. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात पठाणने सांगितले की,''पाकिस्तानचा कर्णधार शोएब मलिकनं पत्रकार परिषदेत हे मान्य केले होते की, त्याला बॉल-आऊटबद्दल माहीत नव्हते. बॉल-आऊटची वेळ आली तेव्हा पूर्ण रन-उप घ्यायचा आहे की निम्मा रन-अप, हेही तो निश्चित करू शकला नाही. दुसरीकडे आम्ही बॉल-आऊटसाठी तयार होतो. त्यामुळे निकाल आमच्या बाजूनं लागला.''
पाहा व्हिडीओ..