पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. लाहोरच्या अतिरिक्त सत्र न्यायलयानं त्याच्याविरोधात दाखल झालेल्या शारीरिक आरोपांचा FIR दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. लाहोरच्या हमिझा मुख्तार हीनं बाबरवर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. शिवाय लग्नाचं वचन देऊन त्यानं शारीरिक संबंध ठेवले होते आणि त्यातून ती प्रेग्नंटही झाली होती. पण, त्यानं ते मुल पाडण्यास भाग पाडल्याचाही आरोप त्याच्यावर महिलेनं केला. या महिलेनं याचिका दाखल करताना वैद्यकिय कागदपत्र पुरावा म्हणून दिले आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश नोमन मुहम्मद नईम यांनी दोन्ही याचिकांकर्त्यांच्या वकिलांची बाजू ऐकली आणि नसीराबाद पोलिस स्टेशनला बाबरविरोधात त्वरित FIR दाखल करण्याच्या सूचना केल्या. यापूर्वी सत्र न्यायायलयाचे न्यायाधीश अबीद रझा यांनी बाबर व त्यांच्या कुटुंबीयांनी हमिझाचा छळ करू नका, असे आदेश दिले. तिला ही तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली जात होती.
काही दिवसांपूर्वी मुख्तारनं पत्रकार परिषद घेऊन खळबळ माजवली. ''बाबर आझमने 10 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करून गरोदर राहिल्यानंतर धमकावले. गर्भवती झाल्यानंतर मला लग्नाचे आश्वासन देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. जेव्हा मी नसिराबाद पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला, तेव्हा क्रिकेटपटूने मला पुनर्विवाहाचे आश्वासन दिले, परंतु मोठा क्रिकेटपटू झाल्यानंतर बाबर आझमने फक्त निकाहला नकार दिला. पोलिसांनी माझी तक्रार देखील नोंदविली नाही,''असा दावा मुख्तारनं केला होता.