नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तानने जोरदार सुरूवात करून विजयी सलामी दिली. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने १५१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. नवख्या नेपाळचा धुव्वा उडवून पाकिस्तानी संघाने श्रीलंकेकडे प्रस्थान केले. खरं तर शनिवारी श्रीलंकेत पाकिस्तान आणि भारत हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने विराट कोहलीबद्दल मोठे विधान केले. किंग कोहलीला सलाम करत पाकिस्तानी कर्णधाराने विराटसोबतच्या भेटीचा प्रसंग सांगितला.
बाबर आझमने स्टार स्पोर्ट्सशी खास बोलताना सांगितले की, विराट कोहलीसारख्या खेळाडूकडून कौतुक होणे ही एक मोठी गोष्ट आहे. विराट कोहलीसारखा खेळाडू जेव्हा तुमची स्तुती करतो तेव्हा साहजिकच तुमचा उत्साह वाढतो. यासोबतच बाबर आझमने २०१९ च्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या आठवणीही सांगितल्या.
२०१९ च्या विश्वचषकात खराब खेळीचा सामना करत असताना बाबरने विराटकडून सल्ले घेतले होते, ज्याचा खुलासा खुद्द बाबरनं केला आहे. बाबरने सांगितले की, २०१९ मध्ये विराटचा फॉर्म चांगला होता आणि तो त्याच्या काही समस्या घेऊन विराटकडे गेला होता. विराटने त्याला मदत केली आणि फलंदाजीत सुधारणा व्हावी यासाठी काही सल्ले दिले. मी विराटकडून खूप काही शिकलो असल्याचेही बाबरने नमूद केले.
बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाची उभारीबाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाने उभारी घेतली आहे. बाबर मागील चार वर्षांत एका वेगळ्याच स्तरावर पोहोचला आहे. बाबरने वन डेमध्ये आतापर्यंत १९ शतके झळकावली असून त्याने हा पराक्रम केवळ १०२ डावांमध्ये केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १९ शतके करणारा बाबर पहिला खेळाडू आहे.