Join us  

वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीयांकडून अपेक्षित नव्हतं इतकं प्रेम मिळालं- बाबर आझम

Babar Azam On Team India: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारतीयांचे आभार मानले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 5:05 PM

Open in App

PAK vs NZ T20 Series: भारतात पार पडलेला वन डे विश्वचषक २०२३ म्हणजे पाकिस्तानी संघासाठी एक वाईट स्वप्नच. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानला या स्पर्धेत अफगाणिस्तानकडून देखील पराभव पत्करावा लागला. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही मोठे निर्णय घेत निवड समितीसह कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. मग शाहीन आफ्रिदीला ट्वेंटी-२० तर शान मसूदला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पण, आता पुन्हा एकदा बाबर आझमवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

पाकिस्तानी संघ आगामी काळात मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी बाबरने भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकाबद्दल भाष्य केले. बाबरने भारतीय चाहत्यांचे आभार मानताना म्हटले की, मला वाटले नाही की, भारतात आपल्याला एवढे प्रेम मिळेल. मी पहिल्यांदाच भारतात जात होतो, तेथील काहीच माहिती नव्हती. पण, आम्ही त्यांच्या धरतीवर पाऊल ठेवताच ज्या पद्धतीने आमचे स्वागत करण्यात आले ते अप्रतिम होते. 

बाबरने भारतीय चाहत्यांचे मानले आभार "तो एक वेगळाच अनुभव होता. लोकांनी खूप प्रेम दिले, हैदराबाद विमानतळावर मोठ्या उत्साहात आमचे स्वागत झाले. आमच्या सराव सामन्यांमध्ये देखील प्रेक्षकांनी हजेरी लावली. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. तो वेगळा क्षण होता, संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगाने भरले होते. आम्ही भारतात खेळत होतो त्यामुळे हे साहजिकच होते. पण इतर ठिकाणी आम्ही काही भावनिक क्षण अनुभवले", असे देखील बाबरने सांगितले.

दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला १८ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. आगामी मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला असून केन विल्यमसनसह काही वरिष्ठ खेळाडू या मालिकेला मुकले आहेत. ते आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाहीत. 

PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

  1. १८ एप्रिल - रावळपिंडी
  2. २० एप्रिल - रावळपिंडी
  3. २१ एप्रिल - रावळपिंडी
  4. २५ एप्रिल - लाहोर 
  5. २७ एप्रिल - लाहोर
टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानवन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघ