PAK vs NZ: बाबर आझमकडे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संघाची धुरा आली असून, शाहीन शाह आफ्रिदीची केवळ एका मालिकेनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी शाहीनला कर्णधार बनवले. पण, पुन्हा एकदा बाबरवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी काळात पाकिस्तान मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.
पाकिस्तानी खेळाडूंनी अलीकडेच लष्कराच्या जवानांकडून प्रशिक्षण घेतले. खेळाडू तंदुरूस्त राहावेत या उद्देशाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा फिटनेस कॅम्प आयोजित केला होता. १८ एप्रिलपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार आहे. आयपीएलमुळे किवी संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याकडे पाठ फिरवली. मायकेल ब्रेसव्हेलच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानशी दोन हात करेल. या मालिकेला सुरुवात होण्याआधी शेजाऱ्यांचा कर्णधार बाबर आझमने एका पॉडकास्टला मुलाखत दिली असता विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
यावेळी बाबरला प्रश्न विचारला की, ट्वेंटी-२० चा सामना सुरू आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला एका षटकात विजयासाठी १० धावांची आवश्यकता आहे मग तू अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह की नसीम शाहला गोलंदाजी देशील? यावर पाकिस्तानी कर्णधार म्हणाला की, मी नसीम शाहची निवड करेन. नसीम शाहचे क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे याचा आनंद आहे.
पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ -मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), फिन अलेन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, Cole McConchie, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, Will O’Rourke, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी.
PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक १८ एप्रिल - रावळपिंडी२० एप्रिल - रावळपिंडी२१ एप्रिल - रावळपिंडी२५ एप्रिल - लाहोर २७ एप्रिल - लाहोर