नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत. नवख्या आयर्लंडच्या फलंदाजांने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे. आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने भारतीय दिग्गजांना मागे टाकून सातवा क्रमांक पटकावला. विराट-रोहितशिवाय शुबमन गिल देखील टॉप-१० मध्ये आहे. आताच्या घडीला पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा रॅसी वॅन डर डसन आहे.
दरम्यान, आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने सोळाव्या स्थानावरून सातव्या स्थानी झेप घेतली. अलीकडेच बांगलादेशविरूद्ध झालेल्या वन डे मालिकेत टेक्टरने १४० धावांची अविस्मरनीय खेळी केली होती. त्या मालिकेत टेक्टरने सर्वाधिक धावा केल्या होत्या, ज्याचा फायदा त्याला वन डे क्रमवारीत झाला आहे.
"युवा खेळाडूंना खूप पैसा मिळाल्यावर ते भरकटू शकतात", केएल राहुलने सांगितला अनुभव
वन डे क्रमवारीतील टॉप-१० फलंदाज
- बाबर आझम, पाकिस्तान - ८८६ गुण
- रॅसी वॅन डर डसन, दक्षिण आफ्रिका - ७७७ गुण
- फखर झमान, पाकिस्तान - ७५५ गुण
- इमाम-उल-हक, पाकिस्तान - ७४५ गुण
- शुबमन गिल, भारत - ७३८ गुण
- डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया - ७२६ गुण
- हॅरी टेक्टर, आयर्लंड - ७२२ गुण
- विराट कोहली, भारत - ७१९ गुण
- क्विंटन डिकॉक, दक्षिण आफ्रिका - ७१८ गुण
- रोहित शर्मा, भारत - ७०७ गुण
आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. पहिल्या चारमध्ये तीन पाक खेळाडूंचा समावेश आहे, तर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांचे गुण वाढले नाहीत. पाकिस्तानने अलीकडेच न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळली आणि ४-१ ने विजय मिळवला.