आगामी विश्वचषकासाठी जगभरातील संघ भारतात येण्यास सुरूवात झाली आहे. आज भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानी संघ दुबईला रवाना होईल आणि तिथून बाबर आझमचा संघ हैदराबादमध्ये दाखल होईल. आगामी मोठ्या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी बाबरने पत्रकार परिषद घेऊन आपली रणनीती स्पष्ट केली. भारतीय खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळते, असे मी जाणकारांकडून ऐकले असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय माझा माझ्यापेक्षा संघातील सहकारी खेळाडूंवर अधिक विश्वास असून ते चोख कामगिरी पार पाडतील असा विश्वास देखील पाकिस्तानी कर्णधाराने व्यक्त केला. खरं तर भारतीय सलामीवीर शुबमन गिल आणि बाबर आझम यांच्यात आयसीसी क्रमवारीत रस्सीखेच सुरू आहे. आताच्या घडीला बाबर अव्वल तर गिल दुसऱ्या स्थानी स्थित आहे. यावरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. अशातच 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डा'च्या फेक अकाउंटवरून एक खोटी बातमी पसरवली जात आहे.
दरम्यान, सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. दुसऱ्या सामन्यात गिलने झंझावाती शतक झळकावून बाबरच्या अव्वल स्थानाकडे कूच केली. मात्र, अखेरच्या सामन्यात शुबमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे. याचाच दाखला देत बाबर आझम भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे आभार मानत असल्याचे या व्हायरल पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये सांगितले की, बाबरने राहुल द्रविड यांचे आभार मानले आहेत. कारण त्यांनी शुबमन गिलला तिसऱ्या वन डे सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाबर आझम आणखी काही दिवस अव्वल स्थानी राहीन. लक्षणीय बाब म्हणजे ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत असली तरी हे अकाउंट पीसीबीचे नसून फेक आहे.
५ ऑक्टोबरपासून थरार ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. पाकिस्तानी संघ २९ सप्टेंबरला आपला पहिला सराव सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळेल. बाबर आझमचा संघ हैदराबादमध्ये ६ ऑक्टोबरला विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरूवात नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यातून करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.