नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर पार पडलेल्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) मानकरी यजमान श्रीलंकेचा संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव करून श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच श्रीलंकेला मोठे झटके दिले. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. उपविजेत्या पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमसाठी आशिया चषकाची स्पर्धा निराशाजनक राहिली. कारण स्पर्धेतील 6 सामन्यांपैकी एकाही सामन्यात बाबरला अर्धशतकी खेळी करता आली नाही.
दरम्यान, बाबर आझमने आशिया चषकातील 6 सामन्यांमध्ये केवळ 68 धावा केल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आशिया चषकापूर्वी बाबर आझमने नेदरलॅंडविरूद्ध 3 अर्धशतकी खेळी केल्या होत्या. असे असताना देखील बाबरला आशिया चषकात एकाही सामन्यात साजेशी खेळी करता आली नाही, त्यावरूनच त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. बाबर आझम आशिया चषकाच्या तोंडावर शानदार फॉर्ममध्ये होता. बाबरने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत आणि नेदरलॅंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेत शानदार फलंदाजी केली होती. मात्र आशिया चषकातील कामगिरीवरून बाबरची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
श्रीलंकेने सहाव्यांदा जिंकला आशिया कप अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरूवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावा करू शकला.