Qasim Akram, U19 World Cup - १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाची घोडदौड ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत रोखली. त्यानंतर पाचव्या स्थानासाठी झालेल्या प्ले ऑफ लढतीत पाकिस्तानच्या युवा ब्रिगेडने गुरुवारी श्रीलंकेचा धुव्वा उडवला. पाकिस्तानने हा सामना २३८ धावांनी जिंकून मोठा पराक्रम केला. पण, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार कासिम अक्रम यानं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात असा पराक्रम करणारा कासिम हा पहिलाच खेळाडू ठरला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३ बाद ३६५ धावांचा डोंगर उभा केला. मुहम्मद शेहजादच्या ७३ धावांच्या खेळीनंतर हसीबुल्लाह खान व कासिम यांनी शतक झळकावले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २००+ धावांची भागीदारी केली. खान १५१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १३६ धावांवर बाद झाला. पण, कासिमने अखेरपर्यंत खिंड लढवताना ८० चेंडूंत १३ चौकार व ६ षटकारांनी नाबाद १३५ धावांची खेळी केली.
कासिमचा पराक्रम इथेच संपला नाही. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या फलंदाजांनाही त्याने गुंडाळले. श्रीलंकेचा संपूर्ण संघ १२७ धावांवर माघारी परतला. कर्णधार दुनिथ वेल्लालागे ( ४०) व विनुजा रनपूल ( ५३*) यांची संघर्ष वगळता अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. कासिमने १० षटकांत ३७ धावा देताना पाच विकेट्स घेतल्या. एकाच सामन्यात शतक व पाच विकेट्स घेणारा तो १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
Web Title: Pakistan captain Qasim Akram becomes the first player in the U-19 WC history to score a hundred and take five-wicket haul in a match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.