नवी दिल्ली: आशिया चषक स्पर्धेत भारताकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर 6 दिवस मला झोप लागली नाही, असं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदनं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या संघाला अबूधाबीत झालेल्या सामन्यात बांगलादेशनं पराभूत केलं. त्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. त्याआधी पाकिस्तानचा संघ दोनवेळा भारताकडून पराभूत झाला. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघानं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानची कामगिरी चांगली झालेली नाही. भारताविरुद्ध पाकिस्ताननं अतिशय सुमार दर्जाचा खेळ केला. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खाननं माध्यमांशी संवाद साधला. मी गेले 6 दिवस झोपलेलो नाही, असं सांगितल्यास कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. गेल्या 6 दिवसांपासून मी अस्वस्थ आहे, असं सरफराज म्हणाला. यावेळी त्याला पाकिस्तानच्या पराभवाचं कारण विचारण्यात आलं. त्यावर भाष्य करताना कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दबाव असतोच, असं सरफराज म्हणाला. 'कोणत्याही संघाच्या कर्णधारावर दडपण असतंच. जेव्हा तुमची कामगिरी चांगली होत नसते. संघ लौकिकाला साजेशा खेळ करत नसतो, तेव्हा दबाव असतोच. भारतीय संघाकडून पराभूत झाल्यानंतर मला 6 दिवस झोप आली नाही. यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हेच जीवन आहे,' असं सरफराजनं म्हटलं. आशिया चषकाच्या गट साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. पाकिस्ताननं या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 162 धावांमध्ये आटोपला. यानंतर भारतानं 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा पाठलाग केला. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ बाद फेरीत आमनेसामने होते. यावेळी पाकिस्ताननं 50 षटकांत 7 बाद 237 धावा उभारल्या. हे आव्हान भारतानं 1 गडी गमावून पार केलं. यानंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेशकडून पराभूत झाला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'भारताकडून पराभूत झाल्यापासून झोप उडाली'
'भारताकडून पराभूत झाल्यापासून झोप उडाली'
पाकिस्तानचा कर्णधार भारताविरुद्धच्या पराभवानंतर अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 1:44 PM