पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेत अब्दुल समदनं (Abdul Samad) वादळी खेळीनं लक्षवेधून घेतले आहे. आता हे नाव ऐकल्यावर अनेक क्रिकेट चाहत्यांना काव्या मारनच्या मर्जीतला अन् आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून तुफानी खेळी करणारा जम्मू काश्मीरचा अब्दुल समद आठवला असेल. पण हा तो नाही बरं.
Abdul Samad च्या भात्यातून षटकार-चौकारांची आतषबाजी
सध्याच्या घडीला जो अब्दुल समद चर्चेत आहे, तो एक पाकिस्तानी क्रिकेटर आहे. पाकिस्तानच्या या अब्दुल समदनं आपल्या भात्यातील तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत राष्ट्रीय संघात लवकरच नव्या हिरोच्या रुपात एन्ट्री मारण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानमधील चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेत अब्दुल समदनं २५ चेंडूत ६२ धावा काढल्या. यात त्याने षटकार चौकारांची आतषबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
पँथर्सच्या गोलंदाजांना धु धु धुतलं
फैसलाबादच्या मैदानात रंगलेल्या पँथर्स विरुद्धच्या सामन्यात मारखोर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या अब्दुल समदनं धमाकेदार इनिंग खेळली. तो या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो आला त्यावेळी अखेरच्या ३६-३७ चेंडूचा खेळ बाकी होता. पण या गड्याला एवढेच चेंडू पुष्कळ ठरले. त्याने आपल्या जलवा दाखवून देत २५ चेंडूत ६२ धावांची खेळीत पँथर्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना त्याच्या भात्यातून ६ षटकार आणि ४ चौकार निघाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात विकेट गमावण्याआधी अब्दुल समद याने २४८ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या. त्याच्या स्फोटक अंदाजातील फिनिशिंग टचमुळे मारखोर्स संघाने निर्धारित ५० षटकात ३४७ धावा केल्या.
बाबरपेक्षाही जब्बर खेळाडूंचं दर्शन
समदशिवाय या सामन्यात २८ वर्षीय कामरान गुलाब याने शतकी खेळी केली. या गड्याने फक्त ८८ चेंडूचा सामना करताना सातवी ए लिस्ट सेंच्युरी झळकावली. एका बाजूला बाबर आझमसह पाकिस्तानी संघातील स्टार बॅटर सपशेल अपयशी ठरत असताना नवे भिडू देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरीसह राष्ट्रीय संघात येण्यासाठी तयार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.