ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारे कॅरी कस्टर्न पाकिस्तानच्या संघाला क्रिकेटचे धडे देत आहेत. विश्वचषकाच्या तोंडावर ते पाकिस्तानच्या संघाचे प्रशिक्षक बनले. पण, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत शेजाऱ्यांना अमेरिकेसारख्या नवख्या संघाने लोळवले. त्यानंतर भारताने केलेल्या पराभवामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली. अखेर अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्याने पाकिस्तान स्पर्धेबाहेर झाला.
आगामी काळात पाकिस्तान मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. विशेष बाब म्हणजे पुढच्या वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मीडियाचा दबाव आणि अनेकांच्या तक्रारीनंतर पीसीबीने निवड समितीतून वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांची हकालपट्टी केली. अशातच प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांनी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर गंभीर आरोप केले.
गॅरी कस्टर्न यांची तक्रार
पाकिस्तानातील वृत्तसंस्था समा न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, गॅरी कस्टर्न आणि अझहर महमूद यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले की, आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यादरम्यान तसेच ट्वेंटी-२० विश्वचषकादरम्यान शाहीन आफ्रिदीने गैरवर्तन केले. त्याच्या या वागणुकीचा संघाला फटका बसला.
गॅरी कस्टर्न यांनी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे मेंटॉर म्हणून काम पाहिले. कस्टर्न यांनी भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचेही तीन वर्षे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या तोंडावर कस्टर्न यांची पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. मिकी आर्थर यांनी प्रशिक्षकपद सोडल्यापासून हे पद रिक्त होते. आर्थर यांच्यानंतर मोहम्मद हाफिज याने पाकिस्तानच्या संघाचा संचालक म्हणून काम पाहिले, मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. गॅरी कस्टर्न यांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा झाल्यास कस्टर्न यांनी दक्षिण आफ्रिकेकडून १०१ कसोटी सामने खेळले, त्यामध्ये त्यांनी २१ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली. तर वन डे क्रिकेटमध्येही गॅरी कस्टर्न यांनी १८५ सामने खेळताना १२ शतके आणि ४५ अर्धशतकांसह ६ हजार ७९८ धावा काढल्या होत्या.