Ramiz Raja R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतरही पाकिस्तानी संघाने दुसऱ्या कसोटीसाठी तेच पीच कायम ठेवले, पण संघात मात्र अनेक बदल केले. बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह यांसारख्या अनुभवी बड्या खेळाडूंना विश्रांती देऊन पाकिस्तानने काही नवख्या चेहऱ्यांना संधी दिली. गेल्या ९ कसोटी सामन्यात एकही अर्धशतक न ठोकल्यामुळे बाबर आझमला संघाबाहेर करण्यात आले. पण त्याच्या जागी आज संघात जागा मिळवलेल्या कामरान गुलामने मात्र पहिल्याच प्रयत्नात दमदार अर्धशतकी खेळी केली. याशिवाय सलामीवीर सलीम अयुब यानेही अर्धशतक ठोकले. अयुब फलंदाजी करत असताना पाकिस्तानी समालोचक रमीझ राजाकडून एक अशी चूक घडली, ज्यामुळे भारतीय चाहत्यांना नक्कीच राग येईल.
इंग्लंड विरूद्ध दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानी संघाचा कर्णधार शान मसूद याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पाकिस्तानकडून सईम अयुब आणि अब्दुल्ला शफीक या सलामीवीरांच्या जोडीने अतिशय संयमी सुरुवात केली. ५ षटकांत पाकिस्तानने एकही गडी न गमवता १५ धावा केल्या. त्यानंतर ६व्या षटकात स्पिनर जॅक लीच गोलंदाजीला आला. त्यामुळे समालोचक रमीझ राजा याने पहिल्या आणि दुसऱ्या डावातील स्पिनरच्या कामगिरीबाबत चर्चा सुरु केली. त्यावेळी बोलताना रमीझ राजा म्हणाला, "पहिल्या डावातील आणि दुसऱ्या डावातील स्पिनरच्या कामगिरीबद्दल मी यासाठी बोललो कारण पहिल्या डावात चांगली कामगिरी करणारा स्पिनर म्हटला की माझ्या डोक्यात भारताच्या रविंदर अश्विनचे नाव येते." ऐका आणि पाहा व्हिडीओ-
अश्विन हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात नावाजलेला फिरकीपटू आहे. त्याने जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या गोलंदाजीने छाप पाडली आहे. तसेच, रमीझ राजा हा देखील ज्येष्ठ समालोचक आहे. अशा वेळी रविचंद्रन अश्विनचे नाव रविंदर अश्विन असे चुकीचे घेणे चाहत्यांना रुचले नाही. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त केली.