Corbin Bosch Mumbai Indians, IPL 2025 vs PSL 2025: भारतात सध्या आयपीएलची धामधूम सुरु आहे. पाकिस्तानच्या कुठल्याही खेळाडूला यात प्रवेश नाही. त्यामुळे त्यांचा जळफळाट होणार हे तर स्वाभाविकच आहे. पण त्याच दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एका खेळाडूच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशला पाकिस्तान सुपर लीग (PSL 1 Year Ban) मध्ये सहभागी होण्यास एका वर्षाची बंदी घातली आहे. IPL मध्ये सहभागी होण्यासाठी कॉर्बिन बॉशने PSL मधून आपले नाव मागे घेतले. त्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कॉर्बिन बॉशवर कारवाई केली आणि त्याच्यावर १ वर्षाची बंदी घातली.
डायमंड श्रेणीत झाली होती निवड
यावर्षी जानेवारीमध्ये पीएसएल ड्राफ्टमध्ये पेशावर झल्मीने डायमंड श्रेणीत ३० वर्षीय कॉर्बिन बॉशची निवड केली होती. दुसरीकडे IPL 2025 मध्ये जखमी झालेला लिझाड विल्यम्स याच्या जागी मुंबई इंडियन्सने बॉशला बोलावले. त्यामुळे PSL सुरू होण्याआधीच तो भारतात आला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) तीळपापड झाला आणि त्यांनी कॉर्बिन बॉशवर एक वर्षाची बंदी घातली.
कॉर्बिन बॉशने मागितली चाहत्यांची माफी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कॉर्बिन बॉश म्हणाला, "पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून माघार घेण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला खूप वाईट वाटते आणि मी पाकिस्तानच्या जनतेची, पेशावर झल्मीच्या चाहत्यांची माफी मागतो. PSL ही एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे आणि माझ्यामुळे झालेली निराशा मला पूर्णपणे समजते. पेशावर झल्मीच्या निष्ठावंत चाहत्यांनो, तुम्हाला निराश केल्याबद्दल मला माफ करा."
मी पुन्हा PSL मध्ये परतेन...
कॉर्बिन बॉश पुढे म्हणाला, "मी माझ्या निर्णयाची नैतिक जबाबदारी घेतो आणि त्याचे परिणाम स्वीकारतो. माझ्यावरील दंड आणि PSL मधून एक वर्षाची बंदी मला मान्य आहे. माझ्यासाठी हा थोडासा कठीण निर्णय आहे, पण मी या अनुभवातून शिकेन आणि भविष्यात नव्याने PSL मध्ये परण्याचा प्रयत्न करेन.