पाकिस्तान क्रिकेटसाठी सध्या खूप कठीण दिवस सुरू आहेत. आधी न्यूझीलंडनं ऐनवेळी दौऱ्यातून माघार घेतली. त्यानंतर इंग्लंडनंही दौरा रद्द केला. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वसीम खान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याबाबत पाक बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं असता गर्व्हर्निंग बोर्डाची बैठक लवकरच होणार आहे याबाबत यात अंतिम निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोरील संकटांची मालिका अद्यापही कायम आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंडनं दौरा रद्द केल्यामुळे खेळाडूंसह संपूर्ण क्रिकेट चाहत्यांच्या भावनांना दुखावलं आहे. पाकिस्तान क्रिकेट सध्या खचलेल्या परिस्थितीत आहे. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच वसीम खान यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मोठा धक्का पाक क्रिकेट बोर्डाला बसला आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
वसीम खान यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला पाक बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. खान यांच्या राजीनाम्याबाबत बोर्डाच्या बैठकीत चर्चा केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. आशियाई देशांसाठी इंग्लंडच्या प्रस्तावित दौऱ्यासाठी वसीम खान यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. याशिवाय न्यूजीलंड दौऱ्याबाबतही त्यांनी पुढाकार घेतला होता. पण सुरक्षेचं कारण देऊन दोन्ही देशांनी दौरा रद्द केला. वसीम खान यांना २०१९ साली माजी सीईओ एहसान मनी यांच्या जागेवर नियुक्ती केली होती.
दरम्यान, वसीम खान यांच्या पदाचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ साली संपुष्टात येणार होता. पण त्याआधीच खान यांनी राजीनामा दिला आहे.