ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आयसीसीची ही स्पर्धा शेजाऱ्यांच्या देशात व्हावी यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील आहे. मात्र, बीसीसीआयने आधीपासून पाकिस्तानच्या धरतीवर खेळण्यास नकार दिल्याने संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड येत्या २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन आपल्या मायदेशी करण्यासाठी उत्सुक आहे. मागील वर्षी पाकिस्तानने आशिया चषकाचे आयोजन केले होते. पण ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात आली. त्यामुळे भारताचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आता याप्रकरणी मौन सोडलं आहे. दरम्यान, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचा आमचा कोणताही विचार नाही. गेल्या आठवड्यात दुबईत आयसीसीच्या बैठकीदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशी चर्चा केली असल्याचंही पीसीबीचे अध्यक्ष नक्वी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची दुबईत बैठक पार पडली. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवनिर्वाचित अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यात चर्चा झाल्याचे कळते. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येईल अशी आशा असल्याचे नक्वी यांनी नमूद केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी म्हणाले की, बीसीसीआय सचिव जय शाह आणि आमच्यामध्ये काही वेळ चर्चा झाली. बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल अधिक सांगणं योग्य ठरणार नाही. एकूणच पीसीबी अध्यक्षांनी सूचक विधान करत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात यावा यासाठी आग्रह धरला. त्यामुळे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा नेमकी कुठे खेळवली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.