PAK vs BAN 2nd Test Match : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशसमोर यजमानांना कडवी झुंज देण्याचे मोठे आव्हान असेल. २१ ऑगस्टपासून मालिका खेळवली जाईल. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. याआधी मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांनी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हापासून ते विजयाच्या शोधात आहेत. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख खेळाडू बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर कोणतीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही. तर सौद शकीलला लॉटरी लागल्याचे दिसते. कारण त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढल्याचे दिसते. दुसरा सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्याच्या पीसीबीच्या धोरणाला माजी खेळाडूंनी विरोध दर्शवला.
अनेकांच्या विरोधानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, पाकिस्तानातील कोणतेही स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यास सक्षम नाही. आपण अजूनही १९८० च्या दशकात जगत आहोत, आपल्या स्टेडियममधील सुविधा जसे की सीट्स आणि बाथरूमची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तानातील सध्याच्या स्टेडियमची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोणतीच सुविधा चांगली नाही... गर्दी अशी असते की तुम्ही तब्बल ५०० मीटर अंतरावरून सामना पाहता की काय असे वाटते.
बांगलादेशचा पाकिस्तान दौरा
न्यूयॉर्कमधील स्टेडियम ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या १०-१५ दिवस आधी बांधण्यात आले होते. त्यामुळे आम्हीही स्टेडियमची दुरुस्ती करत आहोत. गद्दाफी स्टेडियमजवळ हॉटेल बांधण्याचाही आमचा प्रयत्न आहे, कागदोपत्री काम झाले आहे, फक्त त्याचे मॉडेल हा मुद्दा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील स्टेडिमयचा विकास केला जाईल. इस्लामाबादमध्ये नवीन स्टेडियम बांधण्यात येणार आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल लाहोरमध्ये होईल यात शंका नाही, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.
दरम्यान, कराची येथे होणारा दुसरा कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय पार पडणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात पार पडणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कराची येथील नॅशनल बँक क्रिकेट स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश नसेल. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर यादरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. एक निवेदन काढून पीसीबीने प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकत नाही याबाबत खेद व्यक्त केला. पण, हे पाऊल केवळ प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आले असून, आगामी काळात आयसीसीची स्पर्धा होत असल्याने नवीन प्रेक्षक गॅलरीचेही काम सुरू असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.
PAK vs BAN कसोटी मालिका
पहिला सामना, रावळपिंडी (२१ ते २५ ऑगस्ट)
दुसरा सामना, कराची (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)
Web Title: Pakistan cricket board chief Mohsin Naqvi said, final of 2025 Champions Trophy will be played in Lahore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.