PCB Chief Najam Sethi । नवी दिल्ली : 25 मार्चपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. आगामी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ जाहीर झाला असून बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांना विश्रांती देण्यात आली आहे. शादाब खानच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ अफगाणिस्तानविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी मालिकेतील गर्दी आणि खेळाडूंच्या वागणुकीबाबत भाष्य केले. खरं तर मागील वर्षी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील आशिया कप दरम्यान, शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात वाद झाला होता.
दरम्यान, आगामी मालिकेत काही वाद होऊ नये म्हणून नजम सेठी यांनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आहे. मागील वर्षीच्या आशिया चषकामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यादरम्यान फरीद अहमद आणि आसिफ अली यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. तत्कालीन पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सेठी यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी गैरवर्तन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले, "मी दुबईमध्ये अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांशी गर्दी नियंत्रण आणि त्यांच्या खेळाडूंच्या वर्तनाबद्दल चर्चा केली. तुमच्या चाहत्यांना आणि खेळाडूंना सांभाळण्याची हमी काय आहे, कारण पूर्वीचे अनुभव चांगले नव्हते."
नजम सेठी यांची सावध भूमिका
"आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे. आम्हाला जिंकण्याचा आणि पराभवाचा अनुभव आहे, त्यामुळे आम्ही आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो, परंतु ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नवीन आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच UAE अधिकाऱ्यांनी एक नवीन योजना आखली आहे, ज्यामध्ये ते सर्वतोपरी प्रयत्न करतील की पाकिस्तानचे चाहते आणि अफगाणिस्तानचे चाहते एकाच स्टँडवर बसणार नाहीत", असे नजम सेठी यांनी अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Pakistan Cricket Board chief Najam Sethi has said that strict action will be taken in case of misbehavior by Afghanistan fans and players during the PAK vs AFG t20 series in uae
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.