Pakistan vs India, IPL 2022 | BCCIचे सचिव जय शाह यांनी IPL बाबतच्या प्लॅनिंगची घोषणा केली आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा चांगलाच जळफळाट झाल्याचे दिसून आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) आगामी वेळापत्रकात IPL साठी अडीच महिन्यांचा काळ राखीव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जय शाह यांनी दिली. या संदर्भात भारतीय क्रिकेट बोर्डाने इतर क्रिकेट बोर्डांसह ICC शी आधीच चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर, PCB ला चांगलीच मिर्ची झोंबली. IPL शी संबंधित ही विंडो इतर आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये अडथळे निर्माण करेल, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केले. तसेच, याबाबत चर्चा केली जाण्याची गरज असल्याचे मतही 'पीसीबी'चे मांडले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने एका भारतीय वृत्तवाहिनीला सांगितले की, "आयसीसी बोर्डाची बैठक जुलैमध्ये बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान होणार आहे. कदाचित तेथे हा मुद्दा चर्चेसाठी घेतला जाईल. क्रिकेटमध्ये आर्थिक बाबींचा संबंध असल्याने पीसीबी आनंदी आहे. पण प्रत्येक हंगामात IPL साठी प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळवण्याचा विचार करण्याच्या भारतीय बोर्डाच्या योजनेमुळे आंतरराष्ट्रीय मालिका आणि कार्यक्रमांमध्ये बाधा येऊ शकते अशी भीती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे."
जय शाह नक्की काय म्हणाले?
IPL च्या आगामी प्लॅनिंगबाबत जय शाह यांनी पीटीआयला सांगितले होते की, मीडिया अधिकारांमध्ये आधारभूत किंमत खूप जास्त आहे असे बीसीसीआयला कधीच वाटले नाही. पण आता हे समजून घेणे आवश्यक आहे. २०१८ मध्ये ६० सामने झाले. पुढील हंगामात यापेक्षा जास्त सामने होतील. तुम्हाला डिजिटल इफेक्ट्सची देखील तपासणी करणे आवश्यक आहे. २०१७ मध्ये सुमारे ५६ कोटी डिजिटल दर्शक होते आणि २०२१ मध्ये ही संख्या ६६.५० कोटीपर्यंत वाढली. येत्या काही वर्षांत ते आणखी वाढण्याची अपेक्षा तुम्ही आहेत.