नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध मैदानात उतरेल. टी-२० विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी दोन्ही देशातील संघाची घोषणा झाली आहे. मात्र या स्पर्धेच्या अगोदरच पाकिस्तान क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अलीकडेच खेळाडूंसाठी नवीन केंद्रीय करार जाहीर केले आहेत. आता अनेक वरिष्ठ खेळाडूंनी याविरूद्ध आवाज उठवला आहे.
माहितीनुसार, पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान यांसारख्या प्रमुख खेळाडूंनी बोर्डाविरोधात आवाज उठवला आहे. तसेच या केंद्रीय करारामध्ये बदल करायला हवा अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे अनेक असे खेळाडू आहेत त्यांना आश्वासन देऊन त्यांच्याकडून या करारावर स्वाक्षरी करून घेतली आहे. अर्थातच आशिया चषकाची स्पर्धा पार पडल्यानंतर या करारात बदल करण्यात येणार असल्याचे पाकिस्तानच्या खेळाडूंना आश्वासन देण्यात आले आहे.
बोर्डाने लावले अनेक प्रकारचे निर्बंधपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वीच ३३ केंद्रीय कराराची घोषणा केली आहे. यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० साठी विविध प्रकारच्या करारांचा समावेश आहे. मोजकेच खेळाडू असे आहेत ज्यांना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे. नेदरलॅंडला रवाना होण्यापूर्वी पीसीबीने खेळाडूंना या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले मात्र अनेक खेळाडूंनी यावर आक्षेप घेतला होता.
दरम्यान, या करारामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये विदेशी टी-२० लीगमध्ये भाग न घेण्याची परवानगी, आयसीसी इव्हेंटच्या फोटोंचे अधिकार, आयसीसीच्या इव्हेंटची रक्कम आणि जाहिरातींसाठी खेळाडूंच्या स्वाक्षरीसह अन्य काही गोष्टी आहेत ज्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. खेळाडूंनी विविध मार्गांनी आपले म्हणणे पीसीबी समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पीसीबीकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वाद नियंत्रणात असल्याचे पीसीबीकडून सांगितले जात असले तरी अनेक खेळाडू नाराज आहेत. त्यामुळे आशिया चषकाच्या आधी खेळाडूंची ही नाराजी पाकिस्तानची डोकेदुखी वाढवू शकते. करारानुसार, खेळाडूंना एका कसोटी सामन्यासाठी ८ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ५ लाख आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख ७५ हजार एवढे मानधन मिळत आहे.