आगामी काळात अर्थात येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सर्वच देश या बहुचर्चित स्पर्धेच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. अलीकडेच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी जाहीर केले की, आगामी विश्वचषकात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वातच असेल. एकूणच टीम इंडिया पुन्हा एकदा हिटमॅनच्या नेतृत्वात मोठ्या व्यासपीठावर खेळेल. अशातच शेजारील पाकिस्तानने देखील या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. वन डे विश्वचषकातील पराभवानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बदलला अन् ट्वेंटी-२० संघाची धुरा शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
विश्वचषकानंतर पाकिस्तानला बहुतांश सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एका परदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. अशातच पीसीबीने या पदासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनशी संपर्क साधला आहे. खरं तर वॉटसन सध्या पाकिस्तानमध्येच असून तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे.
वॉटसनशी साधला संपर्क पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त आहे. मोहम्मद हफिजवर प्रशिक्षक आणि संघाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण सततच्या पराभवानंतर त्याला या पदावरून काढून टाकण्यात आले. 'ईसपीएन क्रिकइन्फो'ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेन वॉटसनशी संपर्क साधला आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीचा देखील या यादीत समावेश आहे. पण, माहितीनुसार केवळ वॉटसनशी संपर्क साधण्यात आला आहे.
वॉटसनच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाता क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या संघाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे याचे श्रेय अनेकांंनी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला दिले. वॉटसनकडे प्रशिक्षकपदाचा पुरेसा अनुभव आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक राहिला आहे. याशिवाय अन्य लीगमध्येही त्याने प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यामुळे तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही ऑफर स्वीकारतो का हे पाहण्याजोगे असेल.