आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य न देता लीग क्रिकेट खेळल्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफवर कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेत रौफचा करार रद्द केला आहे. एकूणच हारिस रौफला आता बोर्डाकडून मानधन दिले जाणार नाही. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तिथे हारिस उपस्थित होता पण तो बीग बॅश लीगमध्ये खेळत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या कसोटी संघात सामील होण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने मोठी कारवाई केली आहे. खरं तर बोर्डाने वेगवान गोलंदाज हारिस रौफचा केंद्रीय करार रद्द केला आहे. तसेच त्याला ३० जून २०२४ पर्यंत कोणत्याही परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.
हारिस रौफ प्रकरणावर बोलताना पाकिस्तानचा दिग्गज शाहिद आफ्रिदीने हारिसवर बोचरी टीका केली. केवळ पैशांसाठी खेळत राहिल्यास असेच परिणाम भोगावे लागतील असे आफ्रिदीने म्हटले. तो पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. आफ्रिदी म्हणाला की, हारिस रौफने पाकिस्तानी संघातून कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला. तेव्हा तो देखील ऑस्ट्रेलियात होता. दुखापतीचे कारण सांगून त्याने कसोटी मालिका खेळली नाही. पण, तो तिथेच बीग बॅश लीग खेळत होता. तेव्हा मी त्याला हे सर्वकाही चुकीचे असल्याचे सांगितले. मात्र त्याने कानाडोळा केला.
आफ्रिदीचा हारिसला टोलातसेच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केलेली कारवाई अतिशय योग्य आहे. हारिस रौफचा करार रद्द करण्यात आला आहे, यामुळे इतर खेळाडूंना एक धडा मिळेल. फक्त पैशांसाठी खेळणे चुकीचे आहे. त्यामुळे ही कारवाई योग्य आहे, असे आफ्रिदीने म्हटले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की, पाकिस्तानसाठी खेळणे हा कोणत्याही खेळाडूसाठी सर्वोच्च सन्मान आणि विशेषाधिकार आहे. कोणताही वैद्यकीय अहवाल किंवा वैध कारण नसताना पाकिस्तानच्या कसोटी संघाचा भाग होण्यास नकार देणे हे केंद्रीय कराराचे उल्लंघन आहे. त्यामुळे हारिस रौफवर ही कारवाई करण्यात आली.
हारिसवर रौफवर कारवाई ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ आणि व्यवस्थापनाने कसोटी मालिकेदरम्यान रौफचा अल्प कालावधीसाठी वापर करण्याबाबत चर्चा केली होती. पण हारिस रौफने मालिकेतून माघार घेतल्यानंतर रियाझ म्हणाला होता की, हारिसने अशा वेळी पाकिस्तानकडून खेळायला हवे होते जेव्हा संघाला काही अनुभवी खेळाडूंची गरज होती. पण, हारिसने तंदुरूस्त नसल्याचे कारण सांगत आंतरराष्ट्रीय संघात खेळण्यास नकार दिला आणि बीग बॅश लीग खेळली. खरं तर कसोटी क्रिकेट सोडून बीग बॅश लीगमध्ये ट्वेंटी-२० खेळण्यास प्राधान्य देणे हारिसला चांगलेच महागात पडल्याचे दिसते.