ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेत वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांना निवड समितीतून काढून टाकले. पाकिस्तानला साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. अमेरिका आणि भारताकडून झालेल्या पराभवामुळे शेजाऱ्यांचे आव्हान संपुष्टात आले. उल्लेखनीय म्हणजे वहाब रियाझ आणि अब्दुल रजाक यांच्या हकालपट्टीनंतर आता निवड समितीमध्ये केवळ ५ सदस्य उरले आहेत. यामध्ये मुख्य प्रशिक्षक, सर्व फॉरमॅटचे कर्णधार, मोहम्मद युसूफ, असद शफीक आणि डेटा विश्लेषक बिलाल अफझल यांच्या नावांचा समावेश आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड समितीतून हकालपट्टी केल्याने वहाब रियाझने नाराजी व्यक्त केली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली. वहाब म्हणाला की, निवड समितीच्या सदस्यांवर दबाव वाढवण्याबाबत चर्चा होत असलेल्या विधानांशी मी अजिबात सहमत नाही. एक जणाचे मत सहा जणांवर कसे वर्चस्व गाजवू शकते? मीटिंगच्या मिनिटांत सर्व काही रेकॉर्डवर नोंदवले जाते. तरीदेखील हा निर्णय का घेण्यात आला?
दरम्यान, अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्याने पाकिस्तानचा संघ अधिकृतपणे विश्वचषकातून बाहेर झाला. पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना उशीरा सुरू झाला. १० वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी ११.४६ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. पावसामुळे विलंब झाल्याने ही लढत ५-५ षटकांची खेळवण्यात येणार होती. ११ वाजता खेळपट्टीची पाहणी करताना काही मैदानावरील काही ओल्या पृष्ठभागावर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तितक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आणि वीजांचा कडकडाटही झाला. त्यामुळे पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली. सामनाधिकारी जवागल श्रीनाथने सामना रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठी ट्वेंटी-२० विश्वचषक म्हणजे एक वाईट स्वप्नच. तो संपूर्ण स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करताना दिसला. त्याला चार सामन्यांमध्ये केवळ १२२ धावा करता आल्या. ४४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. १०१.६६ च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या बाबरला संथ खेळीवरूनही ट्रोल करण्यात आले.