राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला खेळाडू कामरान अकमल अडचणीत सापडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावर केलेल्या कमेंटमुळे ही नोटीस पाठवली आहे. कामरान अकमलला पीसीबीच्या कायदेशीर विभागाने रमीझ राजाच्या वतीने नोटीस पाठवली आहे. अकमल आयपीएलमध्ये खेळला आहे.त्याने राजस्थान रॉयल्सकडून ६ सामने खेळले आहेत.
कामरान अकमल याच्यावर नेमके कोणते चार्जेस लावले आहे, याची माहिती मिळालेली नाही. अकमल याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या लीगल विभागाकडून ही नोटीस आली आहे. चुकीची विधाने करून पीसीबीचे नाव बदनाम करण्यासा संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
अशा कायदेशीर नोटीस आणखी काही माजी क्रिकेटपटूंना पाठवल्या जाऊ शकतात, जे त्यांच्या यूट्यूबवरुन सतत काही ना काही कमेंट करत आहेत. पाकिस्तान संघ आणि बोर्डावर टीका करताना त्यांनी सीमारेषा ओलांडली आहे, असं पीसीबीने म्हटले आहे. पीसीबी आणि रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेटविरुद्ध चुकीची विधाने खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी रमीझ राजाने पीसीबीच्या कायदेशीर टीमला स्पष्ट निर्देश दिले आहेत. जर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर आणि टेलिव्हिजनवर बसून चुकीची किंवा अशी विधाने केली, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा मलिन होईल, तर त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश दिले आहेत.
इंग्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर काही माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेटवर चुकीची विधाने केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात बदल आवश्यक आहे, अशी विधानेही काहींनी केली होती.