नवी दिल्ली : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला एकदा वन डे विश्वचषक जिंकण्यात यश आले आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने १९९२ च्या विश्वचषकावर कब्जा केला होता. पाकिस्तानने १४ ऑगस्ट रोजी ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यानिमित्ताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये १९५२ पासून ते आतापर्यंत देशाच्या क्रिकेट संघाचे ऐतिहासिक आणि महत्त्वाचे पैलू व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत. मात्र, पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना यातून वगळण्यात आले. खरं तर पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणारे इम्रान खान हे एकमेव कर्णधार आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाने १९९२ चा विश्वचषक जिंकला होता. इम्रान यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत कौशल्य दाखवून आपल्या देशाला जग्गजेते बनवले होते. त्यांनी १९९२च्या विश्वचषकात १८५ धावा केल्या होत्या, तर ७ बळी घेतले होते. पाकिस्तानने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून किताब पटकावला होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर इम्रान यांनी राजकीय खेळी सुरू केली पण आता ते तुरूंगात आहेत. इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर इम्रान खान यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवल्याने ही कारवाई करण्यात आली.
इम्रान यांचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विसर पीसीबीने शेअर केलेल्या व्हिडीओत पाकिस्तान क्रिकेट संघाचे १९५२ ते १९५८ पर्यंतचे संस्मरणीय क्षण दाखवण्यात आले आहेत. १९८६ साली भारताविरुद्ध जावेद मियांदादने शारजाहमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता, हा क्षण देखील दाखवण्यात आला आहे. त्यानंतर १९९२ च्या विश्वचषकाशिवाय २००० आणि २०१२ मध्ये पाकिस्तानच्या आशिया चषकात चॅम्पियन होण्याच्या प्रवासाचा उल्लेख आहे. यासोबतच २००९ चा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकण्याचा क्षण दाखवण्यात आला आहे, मात्र १९९२ मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचे कर्णधार इम्रान खान यांचा उल्लेख कुठेही न केल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल केले.