पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आताच्या घडीला शेजाऱ्यांच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी आहे. पण, आता तो कर्णधारपद सोडणार असल्याचे कळते. येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.
वृत्तसंस्था 'टाइम्स नाउ'ने दिलेल्या माहितीनुसार, शाहीन आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावर नाराज आहे. कारण त्यांनी आणि निवडकर्त्यांनी आफ्रिदीशी चर्चा न करता त्याला कर्णधारपदावरून काढले जात असल्याचा आरोप त्याने केला. शाहीनच्या नेतृत्वात पाकिस्तानने केवळ एक ट्वेंटी-२० मालिका खेळली आहे. न्यूझीलंडविरूद्ध खेळलेल्या या मालिकेत शेजाऱ्यांना १-४ असा दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.
बाबर पुन्हा कर्णधार?शाहीन आफ्रिदी कर्णधारपद सोडण्यास तयार आहे. पण बोर्डाकडून याबद्दल कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे त्याने सांगितले. खरं तर माजी कर्णधार बाबर आझमवर पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. या यादीत बाबर आणि मोहम्मद रिझवान यांची नावे आघाडीवर आहेत. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर बाबरला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर कसोटी संघाची धुरा शान मसूद तर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद शाहीन आफ्रिदीकडे देण्यात आले.
अलीकडेच पाकिस्तानी खेळाडूंनी लष्करांच्या जवानांसोबत प्रशिक्षण घेतले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, पाकिस्तान लष्कराच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आगामी काळात होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक, न्यूझीलंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका, आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका यासाठी पाकिस्तानी संघातील खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली.