पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाट्यमय घडामोडींमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आगामी काळात जूनमध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा अर्थात ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान सुपर लीगचा यंदाचा हंगाम संपताच बोर्डाने खेळाडूंची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. खरं तर आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानचे दोन असे खेळाडू उपलब्ध आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशातच कर्णधार बदलाच्या हालचालींना वेग आला असून बाबर आझमवर पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध बाबींवर प्रकाश टाकला. बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. फिक्सिंगमुळे अडचणीत सापडलेल्या मोहम्मद आमिरची पाकिस्तानी संघात एन्ट्री झाली असून यावर पीसीबी अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केला. निवड समितीने हिरवा झेंडा दाखवल्यास आमिर पाकिस्तानसाठी खेळू शकतो, असे नक्वी यांनी सांगितले. अष्टपैलू इमाद वसिमने देखील राजीनामा मागे घेतला आहे.
दरम्यान, भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अनेक बदल करण्यात आले. शाहीन शाह आफ्रिदीला ट्वेंटी-२० तर शान मसूदला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पण, आता नवनिर्वाचित पीसीबी अध्यक्षांनी माजी अध्यक्ष झका अश्रफ यांनी स्थापन केलेली निवड समिती बरखास्त केली आहे. त्यामुळेच नव्या चेहऱ्यांची पाकिस्तानी संघात एन्ट्री झाल्याचे दिसते.