बेताल वक्तव्यानं नेहमी चर्चेत असलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अडचणीत सापडला आहे. यावेळी पाकिस्तान क्रिकेट मंडळानंच ( पीसीबी)नं त्याला सज्जड दम भरताना नोटिस पाठवली आहे. मंगळवारी पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्यावर पीसीबीनं तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. त्यावरून अख्तरनं एक व्हिडीओ अपलोड केला आणि त्यात त्यानं पीसीबीच्या कायदे विभाग आणि वकील तफज्जुल रिझवी यांच्यावरी गंभीर आरोप केले. अख्तरच्या या आरोपांचा रिझवी यांनी चांगलाच समाचार घेतला आणि माजी गोलंदाजाला नोटिस पाठवली. रिझवी यांनी 10 कोटींची मानहानी नोटिस पाठवली आणि त्यात त्यांनी अख्तरला सशर्त माफी मागायला सांगितली आहे.
अख्तरने यू ट्युबर अपलोड केलेल्या व्हिडीओत पीसीबीच्या कायदे विभागावर ताशेरे ओढले होते. ''पीसीबीचा कायदे विभाग नालायक आहे आणि रिझवी हे पण तसेच आहेत,''असा आरोप अख्तरनं केला होता.'' त्याच्या विधानाची गंभीर दखल घेताना पीसीबीचे कायदे सल्लागार रिझवी यांनी त्याला नोटिस पाठवली आहे.