ICC ODI World Cup 2023, IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बरेच वाद झाले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम नाणेफेकीला आला तेव्हा चाहत्यांकडून त्याला चिडवले गेले... पाकिस्तानी खेळाडू डग आऊटमध्ये जात असताना जय श्री रामच्या घोषणा दिल्या गेल्या. आता या विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा मिळण्यास होत असलेल्या विलंबावरूनही PCB ने तक्रार केली आहे.
भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला. अब्दुल्ला ( २०), इमाम-उल-हक ( ३६), कर्णधार बाबर आजम ( ५०) आणि मोहम्मद रिझवान ( ४९) यांच्यामुळे संघ एकवेळेस २ बाद १५५ अशा मजबूत स्थितीत होता. पण, पुढील ३६ धावांत त्यांचे ८ फलंदाज माघारी पाठवले आणि भारताने सामन्यावर पकड घेतली.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्माने ६३ चेंडूंत ८६ धावांची वादळी खेळी केली आणि श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताला ३०.३ षटकांत ३ बाद १९२ धावा करून विजय मिळवून दिला. पण, आता त्या सामन्यावरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत.