PCB Chief Najam Sethi on IPL । नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. यावेळी पाकिस्तान सुपर लीगची (PSL) डिजिटल व्ह्यूअरशिप आयपीएलपेक्षा (IPL) जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेटसाठी ही मोठी बाब असल्याचे सेठी यांनी सांगितले. शनिवारी पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना खेळवला गेला. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोर कलंदर्सच्या संघाने पीएसएल 8चा किताब पटकावला.
दरम्यान, लाहोर कलंदर्सने अंतिम सामन्यात मुल्लान सुल्तान्सवर 1 धावांनी विजय मिळवत यंदाच्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना लाहोरने 6 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुल्तानच्या संघाने देखील शानदार खेळी केली. मात्र, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वातील मुल्तानचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 199 धावा करू शकला. त्यामुळे लाहोरच्या संघाने 1 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा किताब उंचावला.
खरं तर पाकिस्तान सुपर लीग आणि इंडियन प्रीमिअर लीगलमध्ये अनेकदा तुलना केली जाते. अनेक पाकिस्तानी क्रिकेट जाणकारांचा असा दावा आहे की, पीएसएलची गुणवत्ता आयपीएलपेक्षा चांगली आहे कारण येथे अनेक धोकादायक गोलंदाज आहेत, तर आयपीएलमध्ये गोलंदाजांचा वेग जास्त नाही. मात्र, लोकप्रियतेच्या बाबतीत आयपीएल जगभरात खूप प्रसिद्ध आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"