IPL and PSL । नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) धर्तीवर पाकिस्तानमध्येपाकिस्तान सुपर लीगची (PSL) स्पर्धा खेळवली जाते. अलीकडेच पीएसएलचा आठवा हंगाम पार पडला. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोर कलंदर्सच्या संघाने मोहम्मद रिझवानच्या मुल्तान सुल्तानचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा किताब पटकावला. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी एक विधान करून भारताच्या पावलावर पाऊल टाकण्याचे संकेत दिले आहेत. कारण आयपीएलपाठोपाठ आता पीएसएलमध्ये देखील २ संघ वाढणार आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये २ संघ खरेदी करण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचा दावा सेठी यांनी केला आहे.
सेठी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, "पेशावर झाल्मीच्या संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांच्याशी मी चर्चा केलेली नाही. पण त्यांनी फैसलाबाद आणि सिलाकोट या संघांची नावे सुचवली आहेत. हे २ संघ पाकिस्तान सुपर लीगमध्ये येऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे. मला माहिती नाही हे माध्यमांमध्ये कसे आले पण यासाठी ते इच्छुक आहेत हे स्पष्ट आहे."
तसेच जावेद आफ्रिदी यांच्याशिवाय अनेकजणांचा याकडे कल आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये २ संघ खरेदी करण्यासाठी उतरही व्यावसायिक तयार आहेत. २ नवीन संघ आल्याने जुन्या ६ फ्रॅंचायझींना नुकसान होणार नसून उलट फायदा होणार असल्याचे नजम सेठी यांनी अधिक म्हटले. खरं तर सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये एकूण ६ संघ खेळत आहेत. एकूणच पाकिस्तान सुपर लीगमध्ये देखील आयपीएलप्रमाणे बदल होणार असून २ आणखी फ्रँचायझी सक्रिय होणार आहेत.
पाकिस्तान सुपर लीगमधील विद्यमान संघ -
- लाहोर कलंदर्स
- मुल्तान सुल्तान
- पेशावर झाल्मी
- क्वेटा ग्लॅडिएटर्स
- कराची किंग्ज
- इस्लामाबाद युनायटेडC
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"