BCCI vs PCB । नवी दिल्ली : आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद सुरू आहे. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यावर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) विश्वचषकासाठी आम्ही भारतात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे सामने श्रीलंका किंवा बांगलादेशात खेळायचे आहेत. याच वृत्ताला दुजारा देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "होय, आम्हीही याचाच विचार करत आहोत. जर बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवला नाहीतर भारतात होणाऱ्या विश्वचषकातील आमचे सामने बांगलादेश किंवा श्रीलंकेत व्हायला हवेत. कारण आम्हाला भारतात सामने खेळायचे नाही", अशा शब्दांत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला लक्ष्य केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले, "भारत पाकिस्तानात खेळला नाही तर आम्ही देखील भारतात खेळणार नाही. भारत-पाकिस्तान यांचे सामने कुठे व्हावेत याबाबत मार्ग काढायला हवा. पाकिस्तान सुपर लीगमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मजबूत झाले आहे. आम्ही आमच्या पायावर उभे राहिले असून भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. तसेच भारत पाकिस्तानात न आल्याने आमचे नुकसान होईल पण याचा काहीही फरक पडणार नाही.
ICC अधिकाऱ्याचं मोठं विधान काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे महाव्यवस्थापक वसीम खान यांनी मोठे विधान केले आहे. "मला माहित नाही की भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने इतर तटस्थ ठिकाणी खेळवले जातील की नाही. परंतु मला वाटत नाही की, पाकिस्तान त्यांचे सामने भारतात खेळेल. मला वाटते की त्यांचे सामने देखील भारताच्या आशिया कप सामन्यांप्रमाणेच तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागतील", असे आयसीसी अधिकारी वसीम खान यांनी एआरवाय न्यूजला सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"